महत्वाच्या बातम्या

 अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण : आईला घरात कोंडून आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे घरातून जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी नईम पठाण रा. नेमन कॉलनी, राजवाडा, यवतमाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंदिरानगर, बॉम्बे प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या तिची १७ वर्षे ९ महिन्यांची अल्पवयीन मुलगी सध्या शिक्षण सोडून घरी राहत होती. रविवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरी आला. त्याने अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सोबत नेले. महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचा हात झटकून तिला व तिच्या मोठ्या मुलीला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

आई व मोठ्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी बाहेरून दरवाज्याची कडी काढून त्यांची सुटका केली. त्यानंतर परिसरात अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात आला, मात्र ती आढळून न आल्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२७(२) व १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos