महत्वाच्या बातम्या

 वीज दुरुस्तीवेळी समोर आला वाघ : महावितरण कर्मचाऱ्यांनी तासभर विजेच्या खांबावर थांबून वाचवला जीव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल तालुक्यातील फुलझरी गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर वाघामुळे जीवघेणा प्रसंग ओढावला. वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक समोर दबक्या पावलांनी वाघ येताना दिसताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत विजेच्या खांबावरच आश्रय घेतला. जवळपास एक तास वाघ परिसरात वावरत असल्याने कर्मचाऱ्यांना खाली उतरता आले नाही. अखेर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत रखडलेले काम पूर्ण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मूल तालुक्यातील फुलझरी गावात महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम करीत होते. काम सुरू असतानाच अचानक एका वाघाने त्या परिसरात प्रवेश केला. काही क्षणांतच परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्यांनी कोणताही धोका न पत्करता विजेच्या खांबावरच थांबण्याचा निर्णय घेतला.
वाघ बराच वेळ परिसरात वावरत असल्याने खाली उतरणे धोकादायक ठरणार असल्याची जाणीव कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी संयम राखत विजेच्या खांबावरच थांबणे पसंत केले. सुमारे एक तासानंतर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतरच त्यांनी खाली उतरून उर्वरित दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. वनक्षेत्रालगत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

या परिसरात वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, गुराखी, वनकर्मचारी तसेच महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारंवार धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मानव-वाघ संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने संवेदनशील भागात अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos