धानपिकाला नवसंजीवनी : सलग पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा व मोहाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग व दमदारपावसामुळे धानपिकाला नवसंजीवनी मिळाली असून, पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने करपू लागलेल्या धान पिकांना नवजीवन मिळाले असून, शेतशिवार पुन्हा हिरवाईने नटले आहे.त्यामुळे शेतीकामांना वेग आला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
भंडारा तालुक्यातील खमारी (बुट्टी), माटोरा, मांडवी, बेलगाव, किटाडी, मंडणगाव, सीतेपार, सालेहेटी, सुरेवाडा, बेरोडी, करचखेडा, भिलेवाडा आदी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम हा ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा कणा मानला जात असल्याने पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते.
धानाची रोपे करपण्याच्या मार्गावर पोहोचली होती. मात्र, वेळेवर झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून, धान पिकाला मोठा आधार मिळाला आहे.सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतशिवार पुन्हा हिरवेगार झाले असून, पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी नव्या जोमाने शेतीकामाला लागले असून, पुढील लागवड आणि इतर कृषी कामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
जनजीवनावरही परिणाम -
सततच्या पावसाचा काही प्रमाणात जनजीवनावरही परिणाम झाला आहे. जिल्हा मुख्यालयावर रोजंदारीसाठी जाणाऱ्या अनेक मजुरांना पावसामुळे कामावर जाता आले नाही. काही ठिकाणी दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, शेतीच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायक ठरल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे.
मोहाडी तालुक्यातही शेतकऱ्यांना दिलासा -
मोहाडी तालुक्यातील धुसाळा (कांद्री) परिसरासह अनेक गावांमध्येही पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाअभावी धान पिकांसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पन्हे वाळण्याच्या मार्गावर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यामुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली होती.
शनिवार आणि रविवारी पहाटेपासून झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून, सुकू लागलेल्या पेरण्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य उमटले आहे. पावसाअभावी धान लागवडीचा कार्यक्रम पुढे ढकलणाऱ्या शेतकऱ्यांनी आता लागवडीची तयारी सुरू केली असून, येत्या काही दिवसांत या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, शेतीच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेता दमदार आणि सलग पावसाची आवश्यकता अद्याप कायम असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
येलो अलर्ट नदी-नाल्यांपासून दूर राहा -
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करत अतिवृष्टीची शक्यता वर्तविली होती. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे नदी-नाले, धरणे, कालवे आणि तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी-नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच सेल्फी काढण्याचा मोह टाळून जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
News - Bhandara




Petrol Price




