महत्वाच्या बातम्या

 खोट्या बॉम्बस्फोटाच्या कॉलने उडाली मुल पोलिसांची धावपळ : मद्यधुंद तरुणाविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल शहरात डायल -११२ या आपत्कालीन सेवेला बॉम्बस्फोट झाल्याची खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेला वेठीस धरण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा शोध घेत व्यापक तपासणी केली.

मात्र, प्रत्यक्षात कोणताही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान संबंधित तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळून आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुल शहरातील वार्ड क्रमांक १६ येथील रोशन बंडू मेश्राम २४ वर्ष याने २३ जुलैच्या रात्री डायल-११२ वर वारंवार संपर्क साधत मुल शहरात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती दिली. या गंभीर संदेशानंतर पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. संभाव्य ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन कसून तपासणी केली. मात्र, दीर्घ शोधमोहीमेनंतर शहरात कुठेही बॉम्बस्फोट झाल्याचे अथवा संशयास्पद घटना घडल्याचे आढळून आले नाही. 

यानंतर पोलिसांनी माहिती देणाऱ्या तरुणाचा शोध घेतला असता तो सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता मद्यप्राशन केल्याची पुष्टी झाली.

खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणे, आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करणे आणि शासकीय यंत्रणेला विनाकारण कामाला लावल्याप्रकरणी मुल पोलिसांनी रोशन मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस करीत असून, डायल-११२ सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे





  Print






News - Chandrapur




Related Photos