आषाढी एकादशी व श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : आषाढी एकादशी तसेच आगामी श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा शहरातील मंदिर परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापुरवार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगरपंचायत सिरोंचा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आषाढी एकादशी व श्रावण मासादरम्यान शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शन, पूजा-अर्चा व विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने मंदिर परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज असणे आवश्यक आहे.
मात्र, सध्या अनेक मंदिर परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढलेले गवत, अपुरी प्रकाश व्यवस्था तसेच डासांचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक रंजीत गागापुरवार यांनी शहरातील प्रमुख मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, कचरा व झुडपे हटविणे, बंद पडलेले स्ट्रीट लाईट तात्काळ दुरुस्त करणे, डास नियंत्रणासाठी फॉगिंग व ब्लीचिंग पावडरची फवारणी करणे, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच श्रावण मासभर नियमित स्वच्छता व देखभालीसाठी विशेष कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
आषाढी एकादशी व श्रावण मासाच्या काळात भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचर्लावर, समय्या तोकाला, पोचम आकुदारी, मारुती गणपूरपू यांनी व्यक्त केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




