महत्वाच्या बातम्या

 दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडाऱ्यात काँग्रेसचे आंदोलन : दडपशाही थांबवा, अन्यथा जिल्हा बंदचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज व बळाचा वापर केल्याच्या आरोपांनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव तसेच इंडिया आघाडीतील इतर नेते आंदोलनस्थळी पोहोचले.

त्यानंतर या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यात जिल्हा काँग्रेस कमिटी, भंडारा शहर काँग्रेस कमिटी तसेच सर्व तालुका काँग्रेस कमिट्यांच्या वतीने गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. लोकशाही वाचव , संविधान वाचवा अशा घोषणांनी गांधी चौक परिसर दणाणून गेला.

आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथित बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप करत सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याची टीका केली.

निषेध आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भंडारा पोलिस निरीक्षक सुभाष भुसारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व परिस्थितीवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील भूमिका घेत सरकारने तातडीने संवाद सुरू करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी इशारा देताना सांगितले की, सरकारने आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही थांबवून संवादाचा मार्ग स्वीकारला नाही, तर आगामी काळात भंडारा जिल्ह्यात जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास जेल भरो आंदोलन करून लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.

या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी, भंडारा शहर काँग्रेस कमिटी, विविध तालुका काँग्रेस कमिट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.





  Print






News - Bhandara




Related Photos