महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करा : सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या, ग्रामीण रुग्णालयावरील वाढता रुग्णसेवेचा ताण आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाचे तातडीने उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन सादर केले आहे.

सिरोंचाचे नायब तहसीलदार नरेंद्र एस. हलामी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात रवि सल्लम यांनी म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक अहवाल तयार करून राज्य सरकार व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावा. यामुळे सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सिरोंचा तालुक्याची लोकसंख्या सातत्याने वाढत असून त्याचा परिणाम ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवेवर होत आहे. बाह्यरुग्ण तसेच दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.

बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन आणि भूलतज्ज्ञ यांसारख्या महत्त्वाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी शेजारील तेलंगणा राज्यातील रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात मागील काही वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक, एम.बी.बी.एस. डॉक्टर, सहाय्यक अधीक्षक यांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असून आरोग्य सुविधांचा दर्जाही खालावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, दर्जेदार औषधे आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याची प्रक्रिया शासनाने तातडीने सुरू न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रवि सल्लम यांनी दिला आहे.

नायब तहसीलदार नरेंद्र एस. हलामी यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांच्यासह किरणकुमार वेमुला, वसंत डुरके, संपत गोगुला आदी पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos