महत्वाच्या बातम्या

 मुलीच्या प्रेमसंबंधातून पेटला वाद : प्रियकरानेच वडिलांची कुऱ्हाडीने केली हत्या, नागपूर गुन्हे शाखेचा काही तासांत उलगडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे घडलेल्या निर्घृण हत्येचा नागपूर शहर गुन्हे शाखेने काही तासांत उलगडा केला आहे. घराच्या शेडखाली झोपलेल्या ४३ वर्षीय मेहताबसिंह सोहनलाल चौधरी यांची डोक्यावर कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून हत्या करण्यात आली होती. या खुनामागे कौटुंबिक वाद आणि मुलीच्या प्रेमसंबंधाचा मुद्दा कारणीभूत ठरल्याचे तपासात समोर आले असून, मृताच्या मुलीच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंह चौधरी हे पत्नी व मुलांसह मानकापूर परिसरातील गोधनी रेल्वेजवळील जमील सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. ते बांधकामस्थळी मिस्त्री म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील एका तरुणाशी लावून दिले होते. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे मुलगी सुमारे दहा महिन्यांपूर्वी नागपुरात परत आली.

नागपुरात आल्यानंतर तिची मानकापूर परिसरातील एका तरुणाशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि ती त्याच्यासोबत राहू लागली. मुलीच्या या निर्णयाला मेहताबसिंह यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी वारंवार मुलीला पहिल्या पतीकडे परत जाण्याचा आग्रह धरला. मुलगी तयार नसल्याने गेल्या महिन्यात त्यांनी तिला जबरदस्तीने सासरी पाठविल्याचेही तपासात समोर आले आहे. याच कारणावरून मुलीचा प्रियकर मेहताबसिंह यांच्यावर संतप्त होता.

शनिवारी पहाटे मेहताबसिंह हे घराच्या शेडखाली झोपलेले असताना आरोपी तेथे पोहोचला. त्याने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून मेहताबसिंह यांची निर्घृण हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या मेहताबसिंह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस आणि नागपूर शहर गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि संशयितांच्या हालचालींचे विश्लेषण करत पोलिसांनी काही तासांतच या हत्येचा छडा लावला. तपासात मुलीच्या प्रियकराचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी हत्या असून, याच कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos