इमारत तयार, पण उद्घाटनाला वेळ मिळेना : चामोर्शी बसस्थानक अद्याप बंदच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बसस्थानक सर्व सोयी-सुविधांसह पूर्ण होऊन तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे. नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने हक्काची वास्तू असूनही प्रवाशांना मात्र भर पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून, येत्या ७ दिवसांत बसस्थानक सुरू न झाल्यास थेट चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून, नवीन बसस्थानक बंद असल्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना रस्त्याच्या कडेला तासनतास एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले बसस्थानक सर्व सुविधा तयार असतानाही जनतेच्या उपयोगात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत शिवसेना (उबाठा) गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांच्याकडे व्यथा मांडली. त्यानंतर गेडाम यांनी चामोर्शी येथे जाऊन स्थानिक नागरिक व प्रवाशांसमवेत नवीन बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ नेत्यांच्या फिती कापण्याच्या राजकारणामुळे हे स्थानक बंद असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी, जनतेच्या हक्काच्या सुविधांवर राजकारण करणे बंद करा. जर स्थानिक आमदारांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसेल, तर येत्या सात दिवसांत शिवसेना स्वतः जनतेला सोबत घेऊन या बसस्थानकाचे लोकार्पण करेल. त्यानंतर एकही एसटी बस जुन्या ठिकाणी रस्त्यावर उभी राहू दिली जाणार नाही. गरज पडल्यास चक्काजाम आंदोलन करून चामोर्शीकरांना त्यांचा हक्क मिळवून देऊ, असा थेट इशारा दिला.
विकासकामांचे फक्त भूमिपूजन आणि उद्घाटनाचे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आतातरी जागे व्हावे; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




