विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या : बल्लारपूरात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील टिळक वॉर्ड परिसरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिलेचे नाव ज्योत्स्ना मल्लेश दरपेल्ली (वय २८), रा. कॉलरी क्वार्टर, टिळक वॉर्ड, बल्लारपूर असे आहे. ही घटना २९ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योत्स्ना यांचे पती मल्लेश दरपेल्ली हे कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री सुमारे १० वाजता त्यांनी पत्नीला दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ते घरी परतले. रात्री सुमारे ११ वाजता घरी पोहोचल्यावर ज्योत्स्ना यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्राप्त माहितीनुसार, ज्योत्स्ना आणि मल्लेश यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना अपत्य नसल्याने त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. याच कारणामुळे त्या मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनकर धोबे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




