महत्वाच्या बातम्या

 कर्जमुक्ती योजना व पीक कर्ज वाटपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


- जिवती तालुक्यातील मराई पाटण येथे मेळावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतक-यांना पीक कर्जाबाबत तसेच राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी दुर्गम आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील मराई पाटण येथे पीक कर्ज मेळावा घेण्यात आला.   जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पाटण शाखा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या मेळाव्यात कर्जमुक्ती योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनोने, अग्रणी बँक अधिकारी प्रतिक गोंडणे, उमेदचे राजेश दुधे, जिवती येथील सीएफएल सेंटरचे व्यवस्थापक अतुल गोरे, उपसरपंच विकास सोनकांबळै, पोलिस पाटील राहुल सोनकांबळे, बनसोडे यांच्यासह पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनोने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना - २०२६ बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. यात ३ लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी कोणाला मिळणार आहे. तसेच दोन लाखांच्या वर कर्ज असेल तर संबंधित शेतकऱ्याने २ लाखांवरील उर्वरीत रक्कम भरल्यास शासनाच्या वतीने सदर शेतकऱ्याचे दोन लाख बँकेत जमा करण्यात येईल.

तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी कोण पात्र कोण अपात्र याबाबत सविस्तर माहिती दिली. ५० हजार रुपये प्रोत्साहन लाभासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाचे रिन्युअल करणे तसेच कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज दरवर्षी वेळेच्या आत भरावे. नवीन पीक कर्ज व रिन्यूअलसाठी लागणाऱ्या कागदपात्राची यावेळी माहिती देण्यात आली. बचत गटाच्या महिलांनासुध्दा खाते नियमित ठेवण्याचे महत्व समजवून सांगण्यात आले आणि कर्जच्या परतफेडविषयी माहिती देण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos