महत्वाच्या बातम्या

 शहरातील ११ केंद्रावर २ हजार २४५ उमेदवार देणार टीईटी परीक्षा


- २८ जुन रोजी कडेकोट सुरक्षेत पार पडणार परीक्षा

- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परीक्षेच्या तयारीचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जुन रोजी पार पडणार आहे. जिल्ह्यात ११ परीक्षा केंद्रांवर पेपर १ साठी २ हजार २४५ आणि पेपर २ साठी २ हजार ८१८ उमेदावार परीक्षा देणार आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यावर्षी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

परिक्षेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक पार पडली. बैठकीत परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, गोपनीय साहित्याचे वितरण व संकलन, वाहतूक व्यवस्था, नियंत्रण कक्षाचे कार्य, पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. परीक्षेचे सुयोग्य, पारदर्शक व निर्विघ्न आयोजन सुनिश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी संबंधित विभागांना दिल्यात.

नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. प्रत्येक उमेदवारांची परीक्षा केंद्रावर प्रवेशापूर्वी बायोमेट्रीक नोंद, फेस रेकग्नीशन आणि ओळखपत्र पडताळणी केली जाणार आहे. तसेच हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार असून कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांवर एआय आधारीत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून राज्यस्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांच्या हालचाली, परीक्षा कक्षातील वातावरण तसेच संशयास्पद बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. फेस रेकग्निशन प्रक्रियेत उमेदवारांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळख पटविण्यात अडचण करणारे कोणतेही आवरण तपासणीवेळी काढावे लागणार आहे.

दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. लेखनिक बारावीपेक्षा अधिक शिक्षित नसावा, त्याचे १९ वर्षांपेक्षा कमी असावे तसेच तो उमेदवाराचा नातेवाईक नसावा, अशी अट घालण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी अचानक लेखनिकाची मागणी स्वीकारली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अग्रगामी हायस्कूल, जानकीदेवी बजाज सायन्स कॉलेज, भारत ज्ञान मंदिर, इंद्रप्रस्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केसरिमल गर्ल्स हायस्कूल, यशवंत महाविद्यालय, न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जीनियस, न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जीनियस, महादेवपुरा, जेल रोड, सेंट अँथोनी नॅशनल स्कूल आणि रत्नीबाई विद्यालय, मेन पोस्ट ऑफिसजवळ या ११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos