रेल्वे मालधक्का परिसरात रात्री दबा धरून बसलेले लडय्या व सिंघम पोलिसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील रेल्वे मालधक्का परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या वावर करणाऱ्या दोन तरुणांवर बल्लारपूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे बल्लारपूरचे गुन्हे शोध पथक २४ जून रोजी रात्री नियमित गस्त घालत असताना रेल्वे मालधक्का परिसरात एक तरुण इलेक्ट्रिक केबलजवळ दबा धरून बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव तिरुपती उर्फ लड्डया अशोक दासलवार (वय २०), रा. गोरक्षण वार्ड, बल्लारपूर असे सांगितले.
त्याला रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर काही वेळातच मालधक्का रोड परिसरात आणखी एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव साहील उर्फ सिंघम मोहन सिंगरवार (वय २५), रा. रविंद्रनगर वार्ड, बल्लारपूर असे सांगितले. त्यालाही घटनास्थळी उपस्थित राहण्याबाबत कोणतेही ठोस कारण सांगता आले नाही.
दोन्ही घटनांमध्ये रात्रीच्या अंधारात आपले अस्तित्व लपवून चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते परिसरात थांबले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




