महत्वाच्या बातम्या

 ग्राम प्रशासनाकडून बालकामगारांकडून काम : ब्रम्हपुरीतील धाडीत ९ बालकांची सुटका


- चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व पोलिसांची संयुक्त कारवाई; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बालकामगार विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावात बालकामगारांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि ब्रम्हपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ९ बालकामगारांची सुटका केली असून संबंधित ग्राम प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बालकामगारांविरोधात धाडसत्र राबविण्यात येत आहे. याच दरम्यान केंद्र शासनाच्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर एक गोपनीय तक्रार प्राप्त झाली. ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावात ग्राम प्रशासनाकडून बालकामगारांकडून काम करून घेत असल्याची माहिती या तक्रारीत देण्यात आली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे यांच्याशी समन्वय साधून संयुक्त पथकाची नियुक्ती केली.

१० जून २०२६ रोजी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ च्या सुपरवायझर कल्पना फुलझेले, प्रणाली इंदुरकर तसेच ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. छाप्यामध्ये ९ बालकामगार आढळून आले. पथकाने बालकांची माहिती व कागदपत्रांची पडताळणी करून सर्व बालकांना पुढील संरक्षणात्मक कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, चंद्रपूर यांच्यासमोर हजर केले.

या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कामगार आयुक्त कार्यालय, चंद्रपूर यांनाही पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos