महत्वाच्या बातम्या

 रेगडी हळदवाही परिसरातील गोरगरिब नागरिकांसाठी घरकुल काम ठप्प : रेती उपलब्धतेसाठी आठ दिवसांत प्रशासनाला इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना राज्य सरकारच्या पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मिळालेले असले तरी, घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती अद्याप उपलब्ध न झाल्याने काम पूर्णपणे थांबले आहे.

मौजा मंजेगाव, मछली, शामनगर, सिमूलतला, मक्केपल्ली, चापलवाडा, विकासपल्ली, रेगडी माडे आमगाव, पोतेपल्ली आणि इतर आसपासच्या गावांतील नागरिकांनी या परिस्थितीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी याबाबत ठोस पावले उचलली आहेत. संघटनेने मागणी केली आहे की, घरकुल बांधकाम सुरू करण्यासाठी आमगाव घाट किंवा साखरदेव घाट तात्काळ सुरू करण्यात यावा आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांच्या आत काम सुरू न केल्यास विराट जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तहसील कार्यालयाकडून तहसीलदार घारुडे साहेब यांनी स्पष्ट केले की, साखरदेव घाट वनविभागाच्या अधीन असल्यामुळे वनपरवानगीशिवाय काम सुरू करणे शक्य नाही. तसेच आमगाव घाट लिलावात दिल्यामुळे, कंत्राटदार कार्यभार घेतल्याशिवाय नागरिकांना दहा टक्के रेती देणे सध्या शक्य नाही. यामुळे घरकुल पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

यावेळी मंजेगाव येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात भेट देऊन आपली मागणी व्यक्त केली. या वेळी माजी सरपंच रमेश लेकलवार, बोंकंटीवार पाटील, राजू सातपुते, संदीप भोवरे, पलाश घरामी, सुमेन विस्वास, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, संघटन नेते प्रवीण गेडाम आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे नेतृत्व करताना डॉ. खुणे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, आठ दिवसांच्या आत घरकुलांसाठी रेतीची उपलब्धता न झाल्यास, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनाची तयारी करण्यात येईल.





  Print






News - Gadchiroli




Related Photos