५० रुपयांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण : कोठी आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार, मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : अवघ्या ५० रुपयांच्या हरवलेल्या रकमेची तक्रार करायला गेलेल्या नववीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना भामरागड तालुक्यातील कोठी येथील शासकीय आश्रमशाळेत घडली आहे. किरकोळ कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की तो जागीच बेशुद्ध पडला. या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी थेट प्रशासनाला साकडे घातले आहे.
या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक सागर आमनेरकर यांच्यावर मारहाणीचा थेट आरोप करण्यात आला असून, व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवण्यात आले आहे. घटनेच्या निषेधार्थ कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थ व पालकवर्ग १३ एप्रिल रोजी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात एकवटले. यावेळी उपस्थित महिला व पालकांनी शाळेतील एकूणच कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक सागर आमनेरकर यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. किरकोळ पैशांच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारणे ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा शिक्षकांमुळे आश्रमशाळेतील मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्याध्यापक तसेच अधीक्षकांवर लवकरच कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




