फळे, भाजीपाला, फुलशेती व रेशीमसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे : जिल्हाधिकारी वान्मथी सी

- प्रगतीशील शेतकऱ्यांशी संवाद व प्रशिक्षण कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शासनामार्फत केळी, फुले व भाजीपाला विक्री करीता मार्केट जोडणी, फळे भाजीपाला लागवड तांत्रिक मार्गदर्शन व रेशीम शेती व्यवसाय क्लस्टर विकसित करण्यासाठी व्यवसायाकरीता पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.
पवनार येथील हिवरे सभागृह येथे प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट लागवड, मसाले पिक लागवड, फुल शेती लागवड, मशरुम व रेशीम शेती व्यवसायावर आधारीत संवाद व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी रजनी बनसोड, उपविभागीय कृषि अधिकारी वैष्णवी शिंदे, मंडळ कृषि अधिकारी एस.एस.मुडे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी व युवा प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
सिट्रस इस्टेट तळेगाव, आष्टीमार्फत इंडो इस्त्रायल पध्दतीने संत्रा व मोसंबी लागवडसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
मिरची, हळद, अद्रक या मसाला पिकांचे क्लस्टर पध्दतीने नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यास मदत होईल. झेंडू, शेवंती, गुलाब, गॅलरडिया व निशिगंधा या फुलशेती पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रुट लागवड ही नविन व उच्च मुल्य पिके असून योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.
यासाठी कृषि विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत ४० टक्के अनुदान देण्यात येईल. मल्चिंग पेपर व वीड मॅटचा वापर केल्यास तण नियंत्रण प्रभावीपणे होते व मातीतील आर्दता टिकून राहते व उत्पादन वाढते. सोबतच ठिबक व तुषार सिंचन पध्दती अवलंबविल्यास पाण्याची बचत होऊन पीक वाढ अधिक चांगली होण्यास मदत मिळते. तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते, असे अरविंद उपरीकर मार्गदर्शन करतांना म्हणाले.
रजनी बनसोड यांनी देशी रेशीम किटक संगोपन, चाकी टप्पा कोष निर्मिती प्रक्रिया व रेशीम बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन केले. तर शेती तज्ञ शेतकरी प्रवीण बाकडे यांनी मशरुम लागवडी विषयी माहिती दिली. देऊन ऑयस्टर मशरुम लागवड ही कमी खर्चात व स्थानिक हवामानास अनुरुप असल्याचे सांगितले.
चर्चासत्रात मसाला पिकांचे क्लस्टर पध्दतीचे नियोजन, फुलशेती, औषधी वनस्पती लागवड, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच काढणीनंतरची प्रक्रिया व बाजार व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




