नागपूर : नामांकित व्यापाऱ्याची निर्घृण हत्या : घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानीतील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यापाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेले सुचित भोजापुरे (४४) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी खडगाव मार्गावरील निर्जन झुडपांमध्ये आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता, हा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुचित गुरुवारी रात्री कामावरून घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. सर्वत्र शोध घेतला असतानाही त्यांचा थांगपत्ता लागला नाही, आणि अखेर वाडी पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. शुक्रवारी सकाळी खडगाव रोडवरील एका निर्जन ठिकाणी स्थानिकांनी त्यांचा मृतदेह पाहिला.
ओळख पटवण्यात अडचणी -
घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत होता आणि जवळ कोणतीही वस्तू किंवा वाहन नव्हते. त्यामुळे सुरुवातीला मृताची ओळख पटवणे कठीण झाले. अखेर बेपत्ता तक्रारीच्या आधारे नातेवाईकांच्या पाचारणावर त्यांची ओळख पटवली गेली.
हत्येचा संशय आणि तपास -
प्राथमिक तपासानुसार, सुचित यांच्या डोक्यावर बोथट आणि जड शस्त्राने गंभीर वार करण्यात आले आहेत. आरोपींनी मृतदेहावरील कपडे काढून त्याला निर्जन ठिकाणी फेकल्याचा संशय आहे, जेणेकरून ओळख पटणार नाही आणि पुरावे नष्ट होतील. सुचित यांच्या वडिलांनी ही सरळसरळ हत्या असल्याचे सांगत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
पोलीस कारवाई -
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाडी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, व्यावसायिक वैमनस्य किंवा अन्य कारणांसाठी हा प्रकार घडला की नाही, हे तपासले जात आहे.
News - Nagpur




Petrol Price




