नागपूर : बनावट आदिवासी प्रमाणपत्र प्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमात काही विद्यार्थ्यांनी बनावट अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सादर करून प्रवेश घेतल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) ने संशयित विद्यार्थ्यांची यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) कडे पाठवली आणि प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यास सांगितले.
टीआरटीआयने ही यादी राज्यातील १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे पाठवली. त्यानुसार, नागपूर समितीने पाचगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध तक्रार केली आहे. ही राज्यातील या प्रकारातील पहिली नोंद आहे.
नागपूर समितीकडे ४० विद्यार्थ्यांचे पडताळणी प्रमाणपत्रांचे अहवाल मागवण्यात आले. हे विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीएसारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेत होते, परंतु फक्त ३ विद्यार्थ्यांनी वैधतेसाठी समितीकडे अर्ज केला होता. या ३ विद्यार्थ्यांची सुनावणी झाली असतानाही त्यांनी सीईटी सेलकडे पडताळणी प्रमाणपत्र सादर केले, जे अजूनही समितीकडून दिले गेलेले नव्हते.
समितीच्या तपासात ११ जण दोषी आढळले. यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राध्यापक, दोन सहायक प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि बनावट प्रमाणपत्र तयार करणारे ३ दलाल यांचा समावेश आहे. महाविद्यालय पाचगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली. उर्वरित ३७ विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वैधतेसंदर्भात अर्ज आलेले नाहीत, त्यामुळे नागपूर समितीने त्यांना वैधतेसंदर्भातील माहिती दिलेली नाही.
पोलिस उपअधीक्षक वृष्टी जैन यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे खरे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.टीआरटीआयच्या माहितीवरून पोलिस आणि समितीच्या तपासातून हा प्रकरण एसआयटीमार्फत पुढे न्यायालयात पोहोचेल, असे अपेक्षित आहे.
News - Nagpur




Petrol Price




