हिंगणा : रेती भरलेला टिप्पर आणि मॅक्स पीकअप समोरासमोर धडकले; चालक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पीजवळ रविवारी सकाळी सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. राधा की रसोई ढाब्याजवळ घडलेल्या या अपघातात दूध घेऊन जाणारी मॅक्स पीकअप गाडीच्या चालकाचा केबिनमध्येच चिरडून मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख नीलेश झडाणे (वय ३९, रा. वलनी, रोहना, ता. सावनेर) अशी झाली आहे.
माहितीनुसार, मृतक मॅक्स पीकअप क्र. एम एच ३१ एफ सी ३०५६ ने हिंगण्याच्या दिशेने येत असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. दुसरीकडे, मोहगावकडे रेतीने भरलेला टिप्पर क्र. एम एच ४० सी टी ९१५३ मार्गावर होता. या धडकामुळे मॅक्स पीकअपच्या केबिनमध्ये बसलेला चालक चिरडला गेला आणि घटनास्थळीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी संबंधित रुग्णालयात पाठविला. अपघाताची सखोल तपासणी सुरू असून, टिप्पर चालकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हिंगणा पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना दक्ष राहण्याचे आवाहन केले असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे विशेष सुचवले आहे.
News - Nagpur




Petrol Price




