महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीचा गौरव! आलापल्ली आयटीआय आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट संस्था म्हणून उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई/आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुर्गम भागातील विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), आलापल्ली हिला आदिवासी क्षेत्रातील राज्यातील उत्कृष्ट संस्था म्हणून प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील राजभवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात महामहीम उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा बहुमान प्रदान करण्यात आला.

राजभवन येथे दिमाखदार सोहळा आज २१ मार्च २०२६ रोजी राजभवन, मुंबई येथे हा विशेष पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला देशातील व राज्यातील उच्चपदस्थ मान्यवरांची उपस्थिती होती:
प्रमुख पाहुणे: महामहीम उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन.
विशेष उपस्थिती: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.विभागीय उपस्थिती: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा आणि संचालक  सतीश सूर्यवंशी.

आलापल्ली आयटीआयच्या यशाचे त्रिसूत्री मॉडेल
या संस्थेला हा सर्वोच्च पुरस्कार मिळण्यामागे त्यांची केवळ शैक्षणिकच नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक कामगिरी कारणीभूत ठरली आहे:

१. रोजगार निर्मिती: संस्थेच्या ७८ प्रशिक्षणार्थ्यांना लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड या नामवंत कंपनीत नियमित रोजगार मिळवून देण्यात आला आहे.
२. आर्थिक स्वावलंबन: उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेअंतर्गत संस्थेने तब्बल ३ कोटी रुपयांची कामे पूर्ण केली असून, त्यातून शासनाला १६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त करून दिला आहे.
३. सामाजिक बांधिलकी: केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर माणुसकी जपत संस्थेने NSS अंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी आणि पोयरकोठी येथील पूरग्रस्त २०० घरांचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण करून दिले आहे.

आदिवासी संस्कृतीचे पडले प्रतिबिंब -
संस्थेचे प्राचार्य  वैभव बोंगीरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत संस्थेचे प्रशिक्षणार्थी त्यांच्या पारंपारिक आदिवासी वेशभूषेत उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीने राजभवनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले आणि उपराष्ट्रपतींसह सर्व उपस्थितांची मने जिंकली.

नक्षलग्रस्त आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एका संस्थेने आपल्या कतृत्वाच्या जोरावर राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणे, ही संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos