नागपूर विमानतळाने अनुभवला दीड तासांचा थरार


- राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह
- पोलीस विभागाने तत्परतेने उभी केली यंत्रणा
- मॉकड्रिल ठरले यशस्वी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : दुपारी बाराची वेळ. नागपूर विमानतळावर दुपारच्या किशनगड, गोवा, बेंगलोर, मुंबई विमानासाठी प्रवाशांची वर्दळ सुरु होते. या धावपळीच्या वेळेत एटीसी विभागाला शॅडो फिनिक्स एअरलाईन्स (डमी नाव) च्या पायलटचा संदेश येतो. विमानातील फ्यूअल संपत आल्याने रिफिलिंगसाठी तातडीने आम्हाला उतरण्याची परवानगी हा विमान चालक मागतो. यावर विचार विनिमय होऊन सदर विमानाला उतरण्याची परवानगी दिली जाते. विमान सुखरुप उतरते. उतरल्यावर हे विमान रिफिलिंगसाठी नव्हे तर हायजेक करण्यात आलेले विमान असल्याचे स्पष्ट होते. येथून साऱ्या सुरक्षा यंत्रणाची कसोटी ठरते.
विमानचालकाकडून हायजॅकबाबत पुष्टी मिळताच विमानतळाचे वरीष्ठ संचालक आबिद रुही हे एरोड्रम समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्याशी तात्काळ संपर्क साधतात. समितीतील इतर प्रमुख सदस्यांची काँन्फरन्स कॉलद्वारे अवघ्या मिनीटात पहिली बैठक होते. सर्वजन विमानतळाच्या सुरक्षा सभागृहात पोहोचतात. यात मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सराटकर, सीआयएसएफचे वरीष्ठ कमांडट दिलीपकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, वायुदलाचे विंग कमांडर विनित मडवाडकर, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी आणि नागपूर विमानतळाचे वरीष्ठ संचालक आबिद रुही पोहोचतात.
विमानतळावर प्रवासासाठी आलेल्या प्रवासियांनी कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये यादृष्टीने अवघ्या काही मिनीटात सर्व व्यवस्थापन दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या कामांना गती देते. विमानतळाच्या धावपट्टीवर मात्र संबंधित सुरक्षा यंत्रणा पूर्ण नजर रोखून बसतात. विमानातील अतिरेकी हे पायलटच्या मदतीने संवाद यंत्रणेवर ताबा मिळवतात. त्यांची पहिली मागणी असते पाच हजार करोड रुपये व एक हेलिकॉप्टर ! एवढी मोठी रक्कम तात्काळ आणायची कोठून याची खलबते एरोड्रम समितीतील सदस्यांमध्ये सुरु होते. रिझर्व बँकेकडे या रकमेबाबत विचारणा केली जाते. दुसऱ्या बाजुला सुरक्षा सभागृहात बसविण्यात आलेल्या दूरदृष्यप्रणालीद्वारे विमानतळावर लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने हायजॅक झालेल्या विमानाकडे सर्व सुरक्षा यंत्रणा डोळे रोखून बसते.
विमानातील अतिरेकी ऐकायला तयार होत नाहीत. आपल्या मागण्यांवर ते अडून बसतात. प्रवाशांवर अत्याचार त्यांचा सुरु होतो. वाटाघाटीसाठी समितीतील सदस्य अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, विंग कमांडर विनित, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सराटकर, संचालक आबिद रुही चर्चा पुढे सुरु ठेवतात. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने सारी यंत्रणा क्षणात एक होऊन कामाला लागते. येथे तीन पातळीवर नियोजन केले जाते. रनवेवरील सुरक्षा, अतिरेक्यांशी वाटाघाटी, जखमी प्रवासी जर झाले तर त्यांच्या आरोग्याचे व उपचारासाठी सुविधा आणि हायजॅक झालेल्या विमानावर सुरक्षा यंत्रणेद्वारे ताबा मिळविण्यासाठी रणनिती!
दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु असलेली ही कारवाई व वाटाघाटी शेवटच्या निर्णायक स्थितीवर पोहोचते. येथे राष्ट्रीय सुरक्षा गार्डची भूमिका व कर्तव्य पार पाडण्यासाठी सीआयएसएफचे जवान व अधिकारी विमानाला सुरक्षित घेराव टाकतात. वाटाघाटीचा दुवा म्हणून काही निवडक जवान वेश बदलून विमानात प्रवेश मिळवतात आणि क्षणाचाही विलंब न करता सर्व सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेतून आपल्या केलेल्या योजनेनुसार प्रवासांना अतिरेक्यापासून सुरक्षित करतात.
अशा हायजॅक असलेल्या विमानांना सुरक्षितरित्या हाताळण्यासाठी देशातील जी बारा निवडक विमानतळ आहेत त्यापैकी नागपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक आहे. आज दुपारी १२:०० वाजता अँटी-हायजॅक मॉक एक्सरसाईज (Anti-Hijack Mock Exercise - AHME) ही आपल्यातील क्षमता तपासण्यासह तत्परतेने कशा पद्धतीने नियोजन आवश्यक ठरते याचा सरावाचा एक आवश्यक भाग असल्याचे नागपूर विमानतळाचे वरीष्ठ संचालक आबिद रुही यांनी सांगितले. संबंधित आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देताना सर्व संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता, तत्परता आणि समन्वयाची चाचणी घेणे व त्यात अधिक बळकटी आणणे हा याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या मॉक ड्रिलमध्ये मिहान सुरक्षा विभाग, एअरपोर्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सेवा, नरेंद्र नगर अग्निशमन केंद्र, नागपूर शहर पोलीस (ट्रॅफिक, QRT आणि सोनेगाव पोलीस स्टेशन), किंग्जवे हॉस्पिटलची वैद्यकीय पथके, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे टर्मिनल मॅनेजर, एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (AOCC), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), CISF ASG युनिट, NDRF तसेच विमानतळावरील इतर संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या सरावामध्ये युनिफाइड कमांड, आंतर-विभागीय समन्वय आणि सामूहिक जबाबदारी यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले. सर्व यंत्रणांनी उच्च दर्जाची समन्वय क्षमता, शिस्त आणि तत्परता दाखवत प्रभावी प्रतिसाद दिला. संसाधनांचे सुयोग्य नियोजन आणि रिअल-टाइम निर्णयक्षमतेमुळे संस्थात्मक यंत्रणेची सक्षमता अधोरेखित झाली.
अशा प्रकारचे सराव ब्युरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सेक्युरिटी यांच्या विद्यमान नियमावलीनुसार नियमितपणे आयोजित करणे बंधनकारक आहेत. यातून सातत्यपूर्ण तयारी, कायदेशीर अनुपालन आणि प्रणालीची सुदृढता सुनिश्चित होते. तसेच संभाव्य त्रुटी ओळखून समन्वय वाढविणे आणि सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम बनविण्यास मदत होते.
या अँटी-हायजॅक मॉक एक्सरसाईजच्या यशस्वी आयोजनामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळाली असून, सर्व यंत्रणांमधील समन्वय आणि सज्जता अधिक दृढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि उच्चतम सुरक्षा मानके राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची बांधिलकी यामुळे पुन्हा अधोरेखित झाली असल्याचे विमानतळाच्यावतीने सांगण्यात आले.
News - Nagpur




Petrol Price




