महत्वाच्या बातम्या

 गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता समित्या घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्यास तक्रार नोंदवा


- ९८ ठिकाणी धाडीची कारवाई, २८ गॅस सिलेंडर जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सद्यस्थितीत जागतिक युध्द परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅसचा अवैध वापर होण्याची शक्यता देखील आहे. अशा स्थितीत गरगुती गॅसचे वितरण सुरळीत होण्यासाठी तसेच अवैध गॅस विक्री व वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्याला पर्याप्त प्रमाणात एलपीजी सिलेंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये. इंधन कंपन्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सिलेंडर प्राप्त झाल्यापासून २८ दिवसाचे आत बुकींग करु नये. गॅस वितरकांकडे सिलेंडरसाठी गर्दी टाळावी. तसेच घरगुती सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कारणासाठीच करावा. व्यावसायिक कामाकरीता करु नये.

दक्षता पथकाची स्थापना - जिल्ह्यासाठी खरेदी अधिकारी चंद्रशेखर वानखडे, कनिष्ठ लिपिक शुभम मेश्राम, एपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल या कंपनीचे विक्री अधिकारी यांची जिल्हास्तरीय पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

तर तालुक्यासाठी पुरवठा निरिक्षण अधिकारी मनिषा मांजरखेडे, कनिष्ठ लिपिक सारिका वाघ, सेलू  पुरवठा निरिक्षण अधिकारी आंचल बांगरे, पुरवठा निरिक्षक कविता उरकुडे, आर्वी पुरवठा निरिक्षण अधिकारी अनिता वानखेडे, कनिष्ठ लिपीक रणजित देशमुख, आष्टी पुरवठा निरिक्षण अधिकारी हेमराज्ञी वरठी, कनिष्ठ लिपीक नामदेव पालकर, कारंजा पुरवठा निरिक्षण अधिकारी भुषण राऊत, पुरवठा निरिक्षक सोनाली रेवाळे, हिंगणघाट पुरवठा निरिक्षण अधिकारी गौरव भांडेकर, पुरवठा निरिक्षक रुपाली धाबर्डे, समुद्रपूर पुरवठा निरिक्षण अधिकारी कमलेश कुंभरे, लक्ष्मण संपाळ, देवळी पुरवठा निरिक्षण अधिकारी चांदणी शिवरकर, अजिंक्य गोठाणे यांच्यासह प्रत्येक तालुका पथकामध्ये संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर पथकांना घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरीता गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार प्रत्येक पथक प्रमुखाने दरमहा ठरवून दिलेल्या रोष्टरप्रमाणे धाडी व तपासणी बाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत आठही तालुक्यात पथकांनी केलेल्या ९८ ठिकाणी तपासणी व धाडीच्या कारवाईत २८ गॅस सिलेंडर जप्त करुन ८४ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये यामध्ये वर्धेत १८ ठिकाणी ४ सिलेंडर १२ हजार रुपये, सेलू १० ठिकाणी २ सिलेंडर  ६ हजार रुपये, देवळी १२ ठिकाणी ११ सिंलेडर ३३ हजार रुपये, हिंगणघाट १६ ठिकाणी १२ सिलेंडर ३६ हजार रुपये, असे एकुण २८ सिलेंडर जप्त करुन ८४ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

समुद्रपूर येथे १५, आर्वी येथे १० आष्टी व कारंजा येथे ८ ठिकाणी धाडीची कारवाई करण्यात आली. घरगुती सिलेंडरचा, व्यावसायिक वापर होत असल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos