महत्वाच्या बातम्या

 रत्नापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न : महाराजस्व ने नागरिकांना मोठा दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकारण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान होण्याच्या उद्देशाने शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत तहसील कार्यालय सिंदेवाही यांच्या वतीने रत्नापूर येथील गुरुदेव सामाजिक सभागृह येथे शिबीराचे आयोजन १४ मार्च शनिवारी रोजी करण्यात आले. 

या शिबिरामध्ये नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा उतारा, फेरफार नोंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजना तसेच इतर महसूल विषयक सेवा आणि इतर प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिरामध्ये भूमी अभिलेख विभाग, सामान्य आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, मुद्रांक व नोंदणी विभाग, बचत गट, सेतू केंद्र आणि आधार केंद्र चालक यांनी सहभाग नोंदवला. यावेळी गाव-परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध अर्ज सादर केले, सर्व विभागाच्या योजणांची माहिती जाणून घेतली, सर्व तक्रारीचे निराकरण करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.

 तसेच संजय गांधी योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड काढण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले.सिंदेवाही महसूल आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण शिबिरातच करण्याचा पूर्ण प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी रत्नापूर चे सरपंच अशोक गभने तालुका कृषी अधिकारी कल्याणी औटी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद सुरपाम, भूमी अभिलेख विभागाचे मुख्यालय सहाय्यक धर्मराज बावनथडे, माजी सरपंच सदाशिव मेश्राम उपस्थित होते. 

या अभियानाच्या शिबीर यशस्वीतेसाठी तहसीलदार विजया झाडे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, सागर वाहणे, मंडळ अधिकारी रोशनी कोल्हे, अंबादास गेडाम, राजीव निखाते, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत ताकसांडे, शुभम गुरनुले, दिशा दुधे, बापूजी गेडाम, बंडू दडमल, प्रफुल रहाटे, कैलास मोहुर्ले, महसूल सेवक नोमेश मेश्राम, साहिल नागदेवते, सुकरू मानकर, पोलिस पाटिल नरेंद्र गहाणे आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मिथुन रामटेके यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos