वऱ्हाड्यांच्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकची धडक : खापा चौकात भीषण अपघात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गोंदियाहून लग्नाची वरात घेऊन भंडाऱ्याकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील खापा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झाला. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तीन बालकांना किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रॅव्हल्समधील २६ प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील रहिवासी सतीश बोरकर यांच्या कुटुंबातील लग्नाची वरात भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशन हॉल येथे जात होती. ट्रॅव्हल्स क्रमांक ए.आर.११ सी.९७२९ मध्ये सर्व वऱ्हाडी प्रवास करत होते. दरम्यान, खापा येथील विश्रामगृहाजवळ रामटेककडून गोंदियाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.३१ एफ.सी. ३५०४ ने समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली.
धडक इतकी तीव्र होती की ट्रकचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला असून ट्रॅव्हल्सही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मांगली व खापा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामटेक–गोंदिया मार्गावर ट्रकांची बेदरकार वाहतूक -
रामटेक ते गोंदिया या महामार्गावर रेती, कोळसा तसेच अदानी कारखान्यातील राख वाहून नेणारे अवजड ट्रक मोठ्या प्रमाणात धावत असून वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. या ट्रकांच्या भरधाव वेगामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर स्टेशन टोलीजवळ एका वृद्धाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
खापा चौक बनतोय अपघातांचा हॉटस्पॉट -
खापा चौक परिसरात दर महिन्याला दोन ते तीन अपघात होत असल्याचे वास्तव असून अनेक वेळा जीवितहानीदेखील झाली आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा चौक सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी या मार्गावर तातडीने वाहतूक नियंत्रण व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
News - Bhandara




Petrol Price




