महत्वाच्या बातम्या

 क्षुल्लक वादातून पतीकडून पत्नीचा खून : आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर येथे पतीने पत्नीशी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ३:४५ वाजताच्या सुमारास घडली. कल्पना कमल विश्वास (वय ४२, रा. गौरनगर, ता. अर्जुनी मोरगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, कमल केशव विश्वास (वय ४४) असे आरोपी पतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजल्यापासून ते २६ जानेवारीच्या पहाटेपर्यंत आरोपी कमल विश्वास आणि त्याची पत्नी कल्पना यांच्यात झोपडीत जोरदार भांडण सुरू होते. पती कमल हा बाहेरगावी वास्तव्यास असून, पत्नी कल्पनाने त्याने बाहेरगावी न राहता गौरनगर येथेच राहावे, असा आग्रह धरला होता. मात्र, कमलने गौरनगर येथे राहण्यास नकार दिल्याने दोघांमधील वाद अधिकच तीव्र झाला.

याच वादातून आरोपी पतीने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. या घटनेत कल्पनाचा जागीच मृत्यू झाला. पोलिस चौकशीत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची बाब निष्पन्न झाली आहे.

या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

घटनेनंतर आरोपी पती कमल विश्वास हा फरार झाला होता. पत्नीचा खून केल्यानंतर तो गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरुनुली येथे पळून गेला होता. तसेच, या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे भासवत होता. मात्र, अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपीला गुरुनुली येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी व पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos