महत्वाच्या बातम्या

 दुबई एअरशोमध्ये तेजस कोसळले, हवाई कसरतीदरम्यान अपघात : वैमानिक नमन स्याल यांना वीरमरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘एलसीए तेजस Mk-१ लढाऊ विमानाला दुबई एअरशोमध्ये हवाई कसरतीदरम्यान शुक्रवारी दुपारी अपघात झाला.

या भीषण दुर्घटनेत वैमानिक स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांनी शौर्य दाखवत वीरमरण पत्करले. भारतीय संरक्षण सामर्थ्याचे प्रदर्शन करणाऱ्या या महत्त्वपूर्ण एअरशोला मोठा धक्का बसला असून जागतिक स्तरावरही या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे.

अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरशोच्या अंतिम दिवशी ही घटना घडली. कसरत करताना अचानक उंची कमी झाल्याने तेजस कोसळले. भारतीय हवाई दलाने अपघाताची पुष्टी करत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांग्रा येथील स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांच्या निधनाबद्दल हवाई दलाने गहिवरलेल्या शब्दांत दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, या घटनेशी संबंधित एक आश्चर्यकारक योगायोग समोर आला आहे. अपघाताच्या अवघ्या २४ तास आधीच, तेजसमध्ये तेल गळती होत असल्याचा खोटा दावा सोशल मीडियावर पाकिस्तानी खात्यांकडून पसरवण्यात आला होता.

यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेक युनिटने ठोस स्पष्टीकरण देत ही अफवा फेटाळून लावली होती. दुबईच्या दमट हवामानात एअर कंडिशनिंग आणि ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेटिंग सिस्टीममधून तयार होणारे घनरूप पाणीच ‘तेल गळती’ असल्याचा भास होत असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले होते.

खोट्या दाव्यांना फॅक्ट-चेकचा पूर्णविराम मिळाल्यानंतर लगेचच तेजसचा अपघात झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून सर्वच स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. दुबई एअरशोमध्ये तेजस हे भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे मुख्य आकर्षण होते.

अत्यंत जोखमीच्या, युद्धकालीन ॲक्रोबॅटिक कसरती करताना विमान कोसळले. अपघाताच्या वेळी ‘तेजस’ निगेटिव्ह-जी टर्न घेत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून तपास समिती लवकरच नेमके कारण स्पष्ट करणार आहे.

भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमासाठी हा मोठा धक्का असला, तरी वैमानिक नमन स्याल यांनी दाखवलेले शौर्य आणि देशभक्ती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





  Print






News - World




Related Photos