गोंदिया जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांना धोका : फार्मर आयडी नसल्यास शासकीय योजनांचा लाभ बंद


- १५ जुलैनंतर नुकसानभरपाईसह सर्व योजनांसाठी ओळख क्रमांक अनिवार्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कृषी विभागाच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. या क्रमांकाशिवाय आता कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच मदत व पुनर्वसन विभागानेही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी हा ओळख क्रमांक आवश्यक केला आहे. येत्या १५ जुलैपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू होणार आहे.
जिल्ह्यात २२ हजार शेतकरी अजूनही आयडीविना -
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाक २९ हजार ५४८ शेतकरी नोंदणीकृत आहेत. यापैकी १ लाक ८८ हजार ००७ शेतकऱ्यांना आतापर्यंत फार्मर आयडी प्रदान करण्यात आला आहे. २७ हजार ६७७ शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रिया अवस्थेत आहेत, तर २२ हजार शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ही संख्या लक्षणीय असून, या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फार्मर आयडी का आहे गरजेचा?
फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांची नेमकी ओळख पटते आणि फक्त खरे लाभार्थीच शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे बनावट अर्जदारांना अटकाव होईल आणि शासनाच्या निधीचा अपव्यय रोखता येईल. योजना लाभाच्या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होईल.
काय आहे अॅग्रीस्टॅक?
अॅग्रीस्टॅक योजना ही एक डिजिटल डेटाबेस प्रणाली आहे, जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यांच्या मालकीची शेतजमीन, भू - संदर्भ, पिकांची माहिती आणि महसूल अभिलेख यांची एकत्रित नोंद घेतली जाते. या माहितीनुसार शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो, जो शासकीय योजनांच्या लाभासाठी अनिवार्य आहे.
नुकसानभरपाईसाठीही आता आयडी बंधनकारक -
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक अथवा शेतजमिनीच्या नुकसानीबाबत शासनाकडून मदत दिली जाते. या संदर्भातील पंचनामे महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत होतात. आता ही मदत फक्त फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच दिली जाणार असून, महसूल विभागाने यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे.
१५ जुलै आहे अंतिम मुदत -
कृषी विभागाने १५ एप्रिलपासूनच फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. मात्र खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आता याची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. १५ जुलै ही शेवटची तारीख असून, त्यानंतर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही योजना लागू होणार नाही. त्यामुळे उर्वरित २२ हजार शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून स्वतःला योजनांसाठी पात्र करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
सात - बारा उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
कुठे करायची नोंदणी?
नजिकच्या कृषी सहाय्यक कार्यालयात
आपले सरकार सेवा केंद्र त
तालुका कृषी कार्यालयात
नोंदणी करून फार्मर आयडी मिळवणे ही आता गरज नसून शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. वेळेत नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्या!
News - Gondia




Petrol Price




