महत्वाच्या बातम्या

 हर घर संत रविदास विचार विकसित महाराष्ट्र मोहीम राज्यभर राबविणार


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये मुख्य कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राज्यभर हर घर संत रविदास विचार – विकसित महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. संतांचे मानवता, समानता, सामाजिक न्याय आणि बंधुभावाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, सामाजिक संस्था आणि विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम १३ व १४ फेब्रुवारी २०२७ रोजी नाशिक येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांवर भर -
या मोहिमेत राज्यातील १,०८,१३९ शाळा, ५,८४१ महाविद्यालये, ६५ विद्यापीठे आणि ११,१५० सार्वजनिक ग्रंथालयांना जोडण्याचे नियोजन आहे. निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संत साहित्य वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील.

तसेच मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती व स्वच्छता जनजागृती, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी सेवा उपक्रम आणि श्रमवीर सन्मान यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यातील ६५० गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचेही नियोजन आहे.

डिजिटल रविदास ६५० उपक्रम -
संत रविदास महाराजांचे विचार डिजिटल माध्यमातून पोहोचवण्यासाठी डिजिटल रविदास ६५० हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ई-लायब्ररी, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि ६५० प्रेरणादायी व्हिडिओ कथांचा समावेश असेल.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि तरुणांना उद्योजकतेसाठी आर्थिक मदत देण्याचे प्रस्ताव मांडले. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचाही प्रस्ताव आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश संत रविदास महाराजांचे समानता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक सलोख्याचे विचार जनमानसात रुजवून सामाजिक ऐक्य अधिक दृढ करणे हा आहे.






  Print






Related Photos