महत्वाच्या बातम्या

 मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची जमीन हडप : तिघांवर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातील एका कुटुंबाच्या वारसाहक्काच्या जमिनीवर मृत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार व पॅनकार्ड तयार करून खोटा व्यक्ती उभा करत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी निकूल मगन पटेल वय ६५, रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील स्वर्गीय मगन गोपाल पटेल यांनी सन १९६५ मध्ये माउंट कारमेल स्कूल परिसरातील सर्व्हे क्रमांक १०७/६१ मधील जमीन विकत घेतली होती. त्यांच्या निधनानंतर ही मालमत्ता वारसांच्या नावावर होणे अपेक्षित असताना आरोपींनी त्यांच्या वडिलांच्या नावाने खोटा व्यक्ती उभा करून बनावट आधार कार्ड व पॅनकार्डाच्या आधारे प्लॉट क्रमांक १३, १४, १५ आणि २१ स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, १४ नोव्हेंबर २०१८ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय, चंद्रपूर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्लॉट तारण ठेवून विविध सहकारी बँका व पतसंस्थांकडून ४० लाख, ७५ लाख तसेच दीड कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मॉर्गेज डीड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात महेशसिंग भास्करसिंग डांगे, सरिता मंगेशसिंग डांगे आणि महेंद्र भगवंतराव खनके यांनी संगनमताने मृत व्यक्तीच्या नावाने बनावट ओळखपत्रे तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून वारसांची फसवणूक केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

रामनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३४०(२), ६१ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos