महत्वाच्या बातम्या

 अखेर तीन महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद


- लोकेशन ठरले महत्त्वाचे : आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये होती धास्ती, वन विभागाची नियोजनबद्ध कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जवाहरनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक, शेतकरी तसेच आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या वाघाला अखेर वन विभागाने यशस्वीरीत्या जेरबंद केले. ट्रॅप कॅमेरे, गस्त पथके, वन्यजीव तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि वाघाच्या हालचालींचे अचूक लोकेशन मिळाल्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. कोणतीही जीवितहानी न होता वाघाला सुरक्षितपणे पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

भंडारा तालुक्यातील सालेबर्डी, खैरी पांधी, चिचोली, कोंडी, पेवठा, लोहारा आणि सावरी या गावांच्या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू होता. वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि जंगलालगतच्या वस्त्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवाहरनगर आयुध निर्माणी परिसरातही वाघाचा वावर असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती.

या कालावधीत वाघाने अनेक पाळीव जनावरांवर हल्ले करून नुकसान केले. पेवठा येथील चंद्रभान कचरू हटवार यांच्या गोठ्यातील बैल वाघाने ठार केला होता. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी परसराम मेश्राम यांची गाय, तर २३ फेब्रुवारी रोजी सोमा वंजारी यांच्या मालकीचा बैल आणि एक बकरीही वाघाच्या हल्ल्यात दगावली होती. या घटनांनंतर परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती.

कोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच ऊरकुडा गोडाणे यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह वन विभागाला निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली होती. तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये जनावरे चारताना व शेतात काम करताना नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या होत्या.

मंगळवारी सायंकाळी घोडदौड टी-पॉइंट हिलटॉप परिसरात वाघाचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाने तातडीने विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. परिसरात सापळा रचून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत वाघाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, गस्त वाढवावी, ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गोबरवाही शिवारात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये पुन्हा भीती -

गोबरवाही परिसरातील नरभक्षक वाघाच्या दहशतीतून नागरिक सावरत असतानाच आता शिवारात बिबट्याचा वावर आढळल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १४ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता गोबरवाही सीमेवरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पिंपळाच्या झाडावर बिबट्या बसलेला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटनेमुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली.दरम्यान, बिबट्याचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. वन्यजीवांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन वन विभागाने या भागात गस्त वाढवावी, ट्रॅप कॅमेरे बसवून सतत देखरेख ठेवावी तसेच शेतकरी, मजूर आणि रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos