महत्वाच्या बातम्या

 एसएमडब्लू इस्पातमध्ये उंचावरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू : सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : येथील एसएमडब्लू इस्पात कारखान्यातील रोलिंग मिलमध्ये काम करत असताना उंचावरून खाली पडून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. महेश संजय चौधरी ३४ वर्षे असे मृत कामगाराचे नाव आहे.

या अपघातामुळे एसएमडब्लू इस्पात कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर बराच वेळ कामगाराकडे कोणाचेही लक्ष गेले नसल्याने कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी एसएमडब्लू इस्पातच्या रोलिंग मिलच्या उंच भागावर असलेल्या जुन्या व पूर्णतः खराब झालेल्या टिन पत्रांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कारखान्याच्या आतील भागात प्रकाश पोहोचण्यासाठी ही टिन पत्रे बदलण्याचे काम करण्यात येत होते.

दरम्यान, काम करत असताना कुजलेल्या टिन पत्रांवर पाय पडल्याने पत्रे तुटली आणि महेश चौधरी यांचा तोल जाऊन ते थेट खाली कोसळले. सायंकाळच्या अपुऱ्या प्रकाशामुळे अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.

अपघातानंतरही अर्ध्या तासापर्यंत मदत मिळाली नसल्याचा आरोप -
या घटनेतील गंभीर बाब म्हणजे कामगार खाली पडल्यानंतर जवळपास अर्ध्या तासापर्यंत त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

उंचावर काम करताना आवश्यक सुरक्षा साधने, देखरेख, प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांची प्रभावी अंमलबजावणी होते का, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. शासनाच्या सेफ्टी फर्स्ट या धोरणाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते की केवळ कागदावरच आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

उपचारादरम्यान मृत्यू -
कंपनीच्या सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कामगार महेश संजय चौधरी यांचा रोलिंग मिलच्या शेडवरून खाली उतरताना तोल जाऊन अपघात झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती एसएमडब्लू इस्पात प्रशासनाला देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

याबाबत एसएमडब्लू इस्पातचे सुरक्षा व्यवस्थापक प्रसाद कुकेकर यांनी सांगितले, कंत्राटी कामगार महेश संजय चौधरी यांचा रोलिंग मिलच्या शेडवरून खाली उतरताना तोल जाऊन अपघात झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.





  Print






News - Wardha




Related Photos