महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सत्याग्रह


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, नॉर्मलायझेशन, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, चंद्रपूरच्या वतीने १४ जुलै मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.या आंदोलनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

समितीच्या मते, राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, विद्यार्थ्यांसाठी कार्यरत संस्थांच्या निधीतील कपात तसेच शासकीय नोकऱ्यांमधील वाढते कंत्राटीकरण यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि रोजगाराचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

आंदोलनात एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा व नॉर्मलायझेशन पद्धतीऐवजी ऑफलाइन ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय महाज्योती, बार्टी आणि टीआरटीआय या संस्थांच्या निधी व विद्यार्थी संख्येत कपात करणारा शासन निर्णय मागे घ्यावा, राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी  विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे आणि शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण तात्काळ रद्द करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात येणार आहेत.

समितीचे मुख्य संयोजक डॉ. अनिल डहाके यांनी सांगितले की, हा सत्याग्रह कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संविधानिक लढा आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला डॉ. अनिल डहाके, जितेंद्र पिंपळशेंडे, नंदू नागरकर, दत्ता बारगिरे, ॲड. अजय दुर्गे, देवा पाचभाई, मंगेश गौरकर, अविनाश आडे, अजहर सय्यद, रोशन भोयर, निखिल धोडरे, गोविंद एकडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos