महत्वाच्या बातम्या

 अर्थिंगच्या तारेवर कपडे वाळत घालणे ठरले जीवघेणे : करंट लागून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : घराशेजारी असलेल्या सार्वजनिक विद्युत खांबाच्या अर्थिंगला बांधलेल्या लोखंडी तारेवर ओले कपडे वाळत घालणे एका ४५ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतले. अर्थिंगमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी ५ जुलै दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील गुरनोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेकडीटोला येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिलेचे नाव प्रभा दिनकर मडकाम ४५ वर्ष रा. टेकडीटोला असे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभा मडकाम या रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरातील कपडे धुऊन घराशेजारी असलेल्या सार्वजनिक विद्युत खांबाच्या अर्थिंगला बांधलेल्या लोखंडी तारेवर वाळत घालत होत्या. त्यावेळी संबंधित अर्थिंगमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. प्रभा यांनी ओले कपडे तारेवर टाकताच त्यांना विजेचा तीव्र आणि जोरदार धक्का बसला. धक्क्याची तीव्रता इतकी मोठी होती की त्या जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या.

हा प्रकार कुटुंबीयांच्या व नातेवाईकांच्या निदर्शनास येताच एकच धावपळ उडाली. नातेवाईक देवर्ष भोजराज खुणे तसेच परिवारातील इतर सदस्यांनी वेळ न दवडता चारचाकी वाहनाची व्यवस्था करून त्यांना तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती प्रभा मडकाम यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभा मडकाम यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे टेकडीटोला गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून संबंधित विद्युत यंत्रणेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक विद्युत खांबांच्या अर्थिंगची तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos