महत्वाच्या बातम्या

 हुंड्यासाठी छळाचा आरोप : पती, सासू व सासऱ्याविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगर येथील रहिवासी सादिया अयाजुद्दीन काझी (वय २७) हिचा विवाह डिसेंबर २०२० मध्ये अयाजुद्दीन रियाजुद्दीन काझी याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर पती अयाजुद्दीन काझी याने घरगुती कारणांवरून वारंवार वाद घालत माहेरहून पैसे आणण्याची मागणी सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पैसे न आणल्यास मारहाण करणे, शिवीगाळ करणे तसेच तलाक देण्याची धमकी देत पतीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तसेच सासू रजिया काझी आणि सासरे रियाज काझी हे देखील माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत वाद घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, पतीला दारूचे व्यसन असल्याने त्याच्या व्यसनमुक्तीसाठी कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये ती आपल्या दोन लहान मुलांसह माहेरी रहमत नगर येथे राहण्यासाठी गेली. मात्र त्यानंतर पतीने तिला परत घरी नेले नाही किंवा तिची विचारपूसही केली नसल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, ५ जून २०२६ रोजी ती पतीच्या घरी गेली असता, माहेरहून पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नकोस, असे सांगून तिला घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण समुपदेशनासाठी भरोसा सेल, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. मात्र तेथे आयोजित करण्यात आलेल्या तीन बैठकींनाही पती अयाजुद्दीन काझी गैरहजर राहिल्याचे समोर आले.

अखेर २६ जून रोजी महिलेने पुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती अयाजुद्दीन रियाजुद्दीन काझी, सासू रजिया काझी आणि सासरे रियाज काझी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos