महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाचा मन्नेराजाराम येथे आरोग्य जागर : आठवडी बाजारात १०४ नागरिकांची मोफत तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज, १६ एप्रिल रोजी मौजा मन्नेराजाराम येथील आठवडी बाजार परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील १०४ नागरिकांनी लाभ घेतला असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ (११३ बटालियन) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि त्यांना गावातच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.

या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजीशियन डॉ. शुभम कांबळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मानसी कांबळे, बालरोगतज्ञ डॉ. समीर बन्सोड, पोलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, शैलेश मानमोडे व सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक नारायण यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. यावेळी १०४ नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. तसेच गंभीर आजार असलेल्या १० रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांची आणि गरोदर मातांची विशेष तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

केवळ आरोग्य तपासणीच नव्हे, तर या मेळाव्यादरम्यान पोलीस दलाच्या वतीने जनजागृतीचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, सी-६० पथकाचे शौर्य आणि पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नागरी कृती उपक्रमांची माहिती व्हिडिओ व बॅनरद्वारे नागरिकांना देण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाने २०२१ पासून आतापर्यंत एकूण १९३ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४२ हजार पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी केली आहे. तसेच ऑपरेशन रोशनी अंतर्गत १,४१२ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे, अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मन्नेराजारामचे प्रभारी अधिकारी शुभम शिंदे व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले. पोलीस दलाच्या या संवेदनशील पुढाकाराचे मन्नेराजाराम परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos