आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक : डॉ. आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, तसेच यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि बौद्ध समाजाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक कैलास विष्णू गवते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोनि गवते म्हणाले की, जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, पुतळा पूजन आणि मिरवणूक काढताना सामाजिक सलोखा राखला जाईल याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. विशेषतः कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा किंवा थोर पुरुषाचा पुतळा उभारताना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या २ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार (जीआर क्र. पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९) पुतळा उभारणीबाबत काही कडक मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत सामाजिक विषयांसोबतच युवकांच्या रोजगारावरही चर्चा करण्यात आली. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला आरमोरी परिसरातील ७० ते ८० पोलीस पाटील व विविध गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. गावात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांनी दिले. दुपारी १:१५ वाजता बैठकीची सांगता झाली.
News - Gadchiroli




Petrol Price




