महत्वाच्या बातम्या

 एप्रिलमध्ये विशेष डिजिटल शेती शाळा : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : हवामानातील अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीस संकट निर्माण झाले आहे, तसेच उत्पादनाचा खर्च सतत वाढत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा उद्देश उत्पादन खर्च कमी करणे तसेच प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न सुनिश्चित करणे असा आहे

या अभियानात कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग यांसारख्या विविध यंत्रणा सहभागी होत आहेत. या अभियानाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित चार विशेष डिजिटल शेतीशाळा, ज्या एप्रिल २०२६ महिन्यात आयोजित केल्या जात आहेत.

या डिजिटल शेतीशाळांमध्ये राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठांचे तज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानाचे आदान-प्रदान या शाळांमध्ये होणार आहे.

विशेष डिजिटल शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय -
शेतीशाळा १ (१ एप्रिल २०२६) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, टोकण करणे, शून्य/कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया., शेतीशाळा २ (८ एप्रिल २०२६) : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे., शेतीशाळा ३ (१५ एप्रिल २०२६) : एकात्मिक कीड व्यवस्थापन - सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर., शेतीशाळा ४ (२२ एप्रिल २०२६) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र - भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत, आणि यांत्रिकी पद्धत.

सर्व शेतीशाळा सायंकाळी ७.३० वाजता सुरु होतील आणि यांचे लाइव्ह प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन व उमेद यांच्या YouTube चॅनेलवर केले जाणार आहे.

कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वतीने शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी गट, वनपट्टे धारक यांना मोठ्या संख्येने या डिजिटल शेतीशाळांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos