ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ नागपूरकडून मोबाईल चोरी प्रकरणातील दोन आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ नागपूरने नागपूर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन आरोपींना यशस्वीरित्या अटक केली आहे.
पहिल्या घटनेत, २४ मार्च २०२६ रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पीआरएस (Passenger Reservation System) परिसरातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर सीपीडीएस (Crime Prevention and Detection Squad), सीआयबी (Crime Intelligence Branch) आणि आरपीएफ नागपूर यांच्या संयुक्त पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटवली.
२५ मार्च २०२६ रोजी सतत शोध मोहिम राबवून संबंधित संशयिताला मुंबई एंड लोहापुलिया परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने झोपलेल्या प्रवाशाचा ₹११ हजार ५०० किमतीचा व्हिवो मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी जीआरपी (Government Railway Police) नागपूर येथे गुन्हा नोंदवून आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, त्याच दिवशी प्लॅटफॉर्म क्रमांक १ (इटारसी एंड) येथे दुसऱ्या एका संशयितास ₹१८ हजार ५०० किमतीच्या चोरीच्या व्हिवो मोबाईलसह अटक करण्यात आली. चौकशीत त्याने प्लॅटफॉर्मवर चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी देखील जीआरपी नागपूर येथे गुन्हा नोंदवून आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.
सदर दोन्ही कारवाया मनोज कुमार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या. आरपीएफ नागपूरकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या सामानाबाबत सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा दलाला कळवावे.
News - Nagpur




Petrol Price




