बेपत्ता व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी शेतात मृतदेह आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील दिघोरी मोठी येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी शेतात मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश श्रावण बोरकर (वय ५५, रा. दिघोरी मोठी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बोरकर हे मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. १४ मार्च रोजी ते घरातून बाहेर पडले; मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही ते आढळून न आल्यामुळे कुटुंबीयांनी दिघोरी मोठी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी १५ मार्च रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास रूपचंद देशमुख यांच्या शेतात सुरेश बोरकर यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
कुटुंबीयांच्या अंदाजानुसार, सुरेश बोरकर हे शेताजवळील तळ्याकाठी शौचविधीसाठी गेले असावेत. परत येताना चिखलात पाय अडकल्याने ते पडले आणि त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी दिघोरी मोठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




