महत्वाच्या बातम्या

 मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


- भंडारा जिल्हावासियांसाठी महत्त्वाचे आवाहन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येत आहे. या बाबत जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज आरोग्य प्रशासनाची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत निर्देश दिले.


भंडारा जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (Human Papillomavirus - HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी सावनकुमार, जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक ०६ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिषद कक्ष येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा येथील अधिष्ठाता डॉ.सुजाता दुधगौवकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदिप गजभिये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मनिषा साकोडे तसेच शिक्षणविभाग (प्राथमिक व माध्यमिक), महिला व बालविकास विभाग, जिल्हा माहिती कार्यालयातील प्रतिनिधी  विजय जाधव उपस्थित होते.

मोहिमेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट - गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात ही मोहीम एकूण ९० दिवस (तीन महिने) चालणार आहे.

मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये -

पात्र लाभार्थी - ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांना १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत, अशा सर्व मुली या लसीकरणासाठी पात्र असतील.

लस आणि मात्रा - या मोहिमेत Gardasil- ४ (Quadrivalent HPV) ही लस दिली जाईल. लाभार्थ्याला या लसीचा फक्त एकच डोस (०.५ मि.ली.) डाव्या हाताच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिला जाणार आहे.

लसीकरण ठिकाण - ही लस केवळ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये, जसे की आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र), ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असेल. लसीकरणाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० अशी निश्चित करण्यात आली आहे.

नोंदणी प्रक्रिया - पालकांना आपल्या मुलींची नोंदणी यू-विन (U-WIN) पोर्टलवर स्वतः करता येईल किंवा आरोग्य केंद्रावर जाऊन जागीच (Walk-in) नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या सूचना - लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणापूर्वी मुलींनी आहार घेतलेला असावा, याची खात्री पालकांनी करावी. ही लस अत्यंत सुरक्षित असून लसीकरणानंतर काही वेळ मुलींना आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. कोणत्याही शंकेचे निरासन करण्यासाठी शासनाने १०४ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींच्या पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून त्यांना भविष्यातील कर्करोगाच्या धोक्यापासून सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos