लालघाटीत टाटा सुमोचा भीषण अपघात : ग्रामरोजगार सेवक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दरेकसा मार्गावर शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. खत खरेदीसाठी जात असताना लालघाटी परिसरात टाटा सुमो वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले. या धडकेत वाहन चालक सरोज सोहन कमरे (३२, रा. टेकाटोला, दंडारी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मनोज मदन कमरे (२५), रोहित श्यामलाल कमरे (१८) आणि आर्यन श्यामलाल कमरे (१५) या तिघांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, खत खरेदीसाठी टाटा सुमो (क्र. एमएच ३५ पी ३६९३) वाहनाने टेकाटोला येथून दरेकसाकडे जात होते.
लालघाटी परिसरातील वळण रस्त्यावर आल्यानंतर वाहनाचे ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर जोरात आदळले. अपघातात चालक सरोज कमरे यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील इतर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताचे दृश्य भयावह होते.
घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलावली. सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
अपघाताची माहिती मिळताच दरेकसा, जमाकुडो व टोयागोंदी येथील पोलिसपाटील लालचंद मचिया व साहेबदास बंबुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना वेळेत उपचार मिळवून दिले. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
दरम्यान, मृत सरोज कमरे हे दरेकसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात व कुटुंबात शोककळा पसरली आहे. कुटुंबाच्या आधारस्तंभाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
News - Gondia




Petrol Price




