युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही नाव उज्ज्वल करावे : मा. खासदार डॉ. अशोक नेते


- राजोली येथे भव्य रात्रीकालीन कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
- परिसरात क्रीडामय वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : ग्रामीण भागातील युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करून गडचिरोली जिल्हा व राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केले. धानोरा तालुक्यातील राजोली येथे आयोजित भव्य रात्रीकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
राजोली येथे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य रात्रीकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते फीत कापून, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने अत्यंत उत्साही व जल्लोषमय वातावरणात पार पडले.याप्रसंगी खेळाडू व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते म्हणाले की, कबड्डीसारखे पारंपरिक मैदानी खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहेत.
अशा खेळांमुळे शारीरिक क्षमता, आत्मविश्वास, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. दुर्गम व ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंमध्ये अफाट क्रीडा गुणवत्ता दडलेली असते; मात्र त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. अशा रात्रीकालीन स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य व कर्तृत्व सिद्ध करण्याची उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्यासह भाजपाचे जिल्हा सचिव सारंग साळवे, गावाचे सरपंच, पोलीस पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, स्थानिक पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, स्पर्धेचे आयोजक, क्रीडाप्रेमी तसेच परिसरातील युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, अटीतटीचे व रोमहर्षक सामने पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.




Petrol Price




