महत्वाच्या बातम्या

 भाजपच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला : अंकिता होले यांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अंकिता सचिन होले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टी तालुक्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एका महिलेची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपच्या संघटनात्मक इतिहासात या नियुक्तीची विशेष नोंद झाली आहे. अंकिता होले यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी नियुक्तीपत्र जारी करून अंकिता होले यांच्यावर आष्टी तालुका भाजप संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. पक्ष संघटना अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी काळात बूथ पातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे.

यापूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहणारे सचिन होले यांनी पदाची वर्षपूर्ती झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन तालुकाध्यक्ष कोण होणार, याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. तालुकाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती.

पक्षांतर्गत पातळीवर संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा तसेच मतमतांतरे सुरू होती. त्यामुळे तालुकाध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात होती. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अंकिता होले यांच्या नावाची घोषणा करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे, तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच महिलेला भाजपचे तालुकाध्यक्षपद मिळाल्याने या नियुक्तीकडे राजकीयदृष्ट्याही लक्ष वेधले गेले आहे.

जिल्हा परिषदेत गाजवली आक्रमक कारकीर्द -

अंकिता होले यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना आपल्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण कार्यशैलीची छाप पाडली होती. जनहिताच्या विविध प्रश्नांवर त्यांनी जिल्हा परिषद सभागृहात तसेच सभागृहाबाहेर ठाम भूमिका घेतली. एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून तो प्रभावीपणे मांडणे, संबंधित विषयाचा पाठपुरावा करणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये राहिली आहेत. जिल्हा परिषदेत काम करताना मिळालेला अनुभव आता पक्ष संघटनेच्या कामात कितपत प्रभावीपणे वापरला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गावागावातील पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, बूथ पातळीवरील संघटन मजबूत करणे, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे आणि पक्षाच्या विचारधारेचा व्यापक प्रसार करणे, ही त्यांच्या समोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.

महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह -

अंकिता होले यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या संघटनात्मक नेतृत्वात महिलांना संधी मिळाल्याने तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांना नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंकिता होले यांचे आमदार सुमित वानखेडे, जिल्हाध्यक्ष संजय गाते, आर्वी विधानसभा प्रमुख विजय वाजपेयी, जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, जिल्हा सरचिटणीस तृप्ती पावडे यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. आता तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अंकिता होले पक्ष संघटनेला कोणती दिशा देतात, कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सोबत घेतात आणि आगामी राजकीय आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जातात, याकडे आष्टी तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos