आरमोरीत दुचाकी अन् शेतातील मोटरपंप लांबवणारे पोलिसांच्या जाळ्यात : ५ जण अटकेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरी गेलेली एक दुचाकी आणि सिंचनाचा मोटरपंप असा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
पहिल्या घटनेत, फुले वॉर्डातील स्विटमार्ट व्यावसायिक श्यामसिंह प्रेमसिंह राजपुरोहीत यांची राहत्या घरासमोर उभी केलेली एचएफ डिलक्स दुचाकी (क्र. MH 33 R 4338) १२ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी १३ सप्टेंबरला गुन्हा दाखल होताच आरमोरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कोजबी येथील दीपक जितेंद्र जुमनाके याला १६ सप्टेंबर रोजी निष्पन्न करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली.
दुसऱ्या घटनेत, मौजा गंजेवारी येथील शेतकरी राजू बाजीराव नंदरधने यांच्या शेतातील नाल्यावरील ३ एच.पी.चा मोटरपंप १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेला होता. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत कारवाई करत हरीपाल यवगाजी पात्रीकर, चरण विश्वनाथ नेवारे, मारोती पतीराम कामतकर तिन्ही रा. गंजेवारी पेठटुकुम आणि सत्यवान मुरलीधर शेंडे रा. देऊळगाव, ता. आरमोरी या चौघांना बेड्या ठोकून चोरीचा मोटरपंप जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज व सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक लांबतूरे, पोलिस उपनिरीक्षक सहारे, विक्रांत तळोले, शुभम शिंदे, एएसआय निलकंठ कोकोडे, पोलीस हवालदार लक्ष्मण नैताम, संतोष सराटे, सुरेश झाडे व सुरेश तांगडे यांनी मोलाची भूमिका बजावली. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पीएसआय विक्रांत तळोले आणि पीएसआय शुभम शिंदे करत आहेत.




Petrol Price




