सीईटी परीक्षा २४ सप्टेंबर रोजी पुनश्च होणार


- भंडारा येथील परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा झाली होती स्थगित; संबंधित उमेदवारांची दुसऱ्या सत्रात फेरपरीक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन २०२६-२७ या वर्षासाठी टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थी निवडीकरिता ऑनलाइन सामायिक चाळणी परीक्षा (CET) घेण्यात येत आहे. मात्र, भंडारा येथील एका परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थगित करण्यात आलेली परीक्षा संबंधित उमेदवारांसाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी पुनश्च घेण्यात येणार आहे.
नूतन महाराष्ट्र विद्यालय, माधव नगर, भंडारा या परीक्षा केंद्रावर २२ सप्टेंबर २०२६ रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्या सत्रातील परीक्षा स्थगित करण्यात आली होती.उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तसेच परीक्षेतील समान संधी, पारदर्शकता आणि निष्पक्षता अबाधित राहावी, यासाठी संबंधित सर्व उमेदवारांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही उमेदवाराचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेत ही फेरपरीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
२४ सप्टेंबरला दुसऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा संबंधित उमेदवारांची पुनश्च परीक्षा २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये नूतन महाराष्ट्र विद्यालय, माधव नगर, भंडारा येथे घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेशाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षेचा पेपर दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी निर्धारित वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी वेळेचे पालन करण्याचे आवाहन तांत्रिक अडचणीमुळे यापूर्वी परीक्षा देता न आलेल्या सर्व संबंधित परीक्षार्थींनी २४ सप्टेंबर रोजी नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेचे सुरळीत आयोजन होण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निरीक्षक तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा यांनी केले आहे.
या फेरपरीक्षेमुळे संबंधित उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार असून, तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या परीक्षेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.




Petrol Price




