महत्वाच्या बातम्या

 रिमझिम पावसात ४ हजार बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी : नागपूर शहर झाले विठ्ठलमय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी नागपूर शहरात वारकरी परंपरेचा भव्य आणि भक्तिमय सोहळा पार पडला. रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत शंकरनगर चौक ते बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या शालेय वारकरी दिंडीत ४ हजारांहून अधिक बालवारकऱ्यांनी सहभाग घेतला. टाळ-मृदंगाचा निनाद, लेझीम, फुगड्या, रिंगण आणि अखंड हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा तसेच मराठी संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत, या उद्देशाने या शालेय वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद नागपूर, मराठी भाषा ज्ञानसंवर्धन प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

दिंडीच्या प्रारंभी पालखीतील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती, संतांच्या प्रतिमा आणि पवित्र ग्रंथांचे पूजन स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले.

या प्रसंगी महापौर नीता ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल दहिफळे, मराठी भाषा ज्ञानसंवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र काटोलकर, धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री गावंडे, महापालिकेच्या शिक्षण सभापती संतोषदेवी लढा, नगरसेवक दिलीप दिवे, रितेश गावंडे, वर्षा चौधरी, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष अशोक गुजरकर, कार्याध्यक्ष अविनाश संगवई, भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे तसेच नूतन भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बदतार्दक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

५० हून अधिक शाळांचा सहभाग -
या शालेय वारकरी दिंडीत नागपूर शहरातील ५० हून अधिक शाळांनी सहभाग नोंदविला. सुमारे ४ हजार विद्यार्थी, ५०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्यात सहभागी झाले होते. अभ्यंकरनगर आणि बजाजनगर परिसरातील शेकडो नागरिकांनीही या भक्तिमय दिंडीचे उत्साहाने स्वागत केले.

माता एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. मंदा उमाटे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरात  ज्ञानेश्वर महाराजांच्या पूजन आणि आरतीने या भव्य दिंडीचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वारकरी परंपरेचे संस्कार आणि मराठी संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.





  Print






News - Nagpur




Related Photos