प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत भामरागडमध्ये ५६ लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रारंभ आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत भामरागड नगरपंचायत हद्दीतील पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील ५६ पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचा प्रारंभ आदेश प्रदान करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होणार आहे.
नगरपंचायत प्रशासनाकडून योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची सखोल छाननी करून पात्र ठरलेल्या ५६ लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १५ जुलै २०२६ रोजी घरकुल बांधकामाचा प्रारंभ आदेश देण्यात आला.
यावेळी नगरपंचायत भामरागडचे बांधकाम सभापती तेजस्विनो मडावी तसेच आरोग्य व स्वच्छता सभापती कविता चेतमवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रारंभ आदेशांचे वितरण करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल समाधान व्यक्त करत घरकुलाचे स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली.
नगरपंचायत प्रशासनाने शहरातील पात्र व गरजू नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित, सन्माननीय आणि पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे तसेच नगराध्यक्षा राम कोमटी महाका यांनी पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. भविष्यातही पात्र नागरिकांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ देण्यासाठी नगरपंचायत प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




