० ते १८ वर्षांतील मुलांसाठी ५ जुलै रोजी गडचिरोलीत मोफत टु-डी इको व हृदय तपासणी शिबिर


- बालहृदयरोगाचे वेळेत निदान जीवन वाचवू शकते; पालकांनी संधीचा लाभ घ्यावा : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बालहृदयरोगाचे वेळेत निदान करून गरजू बालकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ५ जुलै रोजी गडचिरोली येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत टु-डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील पालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले आहे.
हे शिबिर सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० या वेळेत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथील सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ.असुतोष सिंग यांच्याकडून बालकांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार टु-डी इको तपासणी करून हृदयातील जन्मजात किंवा इतर विकारांचे निदान केले जाईल. तसेच गरज भासल्यास पुढील उपचार व हृदय शस्त्रक्रियेबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
याबाबत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, अनेक बालकांमध्ये जन्मजात हृदयविकाराची लक्षणे वेळेवर लक्षात न आल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा मुलांचे जीवन पूर्णपणे सुरक्षित करता येते. त्यामुळे या मोफत शिबिराचा लाभ प्रत्येक गरजू बालकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या मुलांना श्वास घेण्यास त्रास होणे, लवकर थकवा येणे, वजन अपेक्षित प्रमाणात न वाढणे, ओठ किंवा नखे निळसर दिसणे, छातीत दुखणे अथवा हृदयविकाराशी संबंधित इतर लक्षणे आढळत असतील, अशा सर्व मुलांना पालकांनी या शिबिरात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाची माहिती आपल्या परिसरातील इतर पालकांपर्यंतही पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक बालकांना तज्ज्ञ वैद्यकीय तपासणीचा लाभ मिळू शकेल. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन यामुळे अनेक बालकांचे आरोग्य सुधारण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
News - Gadchiroli




Petrol Price




