जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा भीती पोटी आगाऊची खरेदी टाळा : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
- घरपोच गॅस सिलेंडर पोहचविण्याचे एजन्सींना निर्देश
- गॅस कंपन्यांकडून एजन्सींना पुरवठा सुरळीत चालू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरु आहे. एजन्सींना पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी नियोजनात सुधारणा केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत दररोज आढावा घेतला जात असून ग्राहकांना गॅस सिलेंडरचे वितरण हे त्यांच्या घरी जाऊन करण्याचे निर्देश गॅस एजन्सीजला दिले आहेत.
नागरिकांनी आपल्या गॅस सिलेंडरसाठी रितसर बुकींग करुन घरपोच सिलेंडर घेण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. गॅस एजन्सींजला तशा स्पष्ट सूचना दिल्या असून यात त्रुटी आढळल्यास जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅस वितरक व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. ग्राहकांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ०७१२-२५६११०६ हा हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नागपूर शहर व जिल्ह्यात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन कंपन्यांकडून एकूण ११० गॅस एजन्सीज कार्यरत आहेत. ज्या ग्राहकांची ई-केवायसी झाली नाही अशा ग्राहकांना ऑनलाईन बुकींगसाठी येणारी अडचण दूर व्हावी यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीने पुढाकार घेऊन ग्राहकांकडून ही केवायसी तत्काळ करण्याचे निर्देश गॅस एजन्सीला देण्यात आले आहे.
यासाठी शासनाच्या वतीने क्यु-आर कोड तयार करण्यात आला असून ग्राहकांना आपल्या मोबाईलद्वारे घरी बसून ऑनलाईन ई-केवायसी करता येईल. या व्यतिरिक्त ई-केवायसीबाबत विविध शिबीरांद्वारे भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा पुरवठा विभागाला दिले.
अशी करता येईल ऑललाईन ई-केवायसी -
सर्वप्रथम दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा. आलेले ॲप प्ले स्टोर मधून डाऊन लोड करावे. आयओसीएल कंपनीचे ग्राहक असल्यास इंडियन ऑईल वन हे ॲप डाऊनलोड करावे. बीपीसीएल कंपनीचे ग्राहक असल्यास बीपीसीएल फॉर बिजीनेस हे ॲप डाऊनलोड करावे.
एचपीसीएल कंपनीचे ग्राहक असल्यास एचपी पे हे ॲप डाऊनलोड करावे. वरील ॲपमध्ये माहिती भरुन आधार फेस आयडी या ॲप वरुन प्रमाणित करुन आपले ई-केवायसी पूर्ण करता येईल.
News - Nagpur




Petrol Price




